धरणगाव | प्रतिनिधी धरणगाव शहरात इंडियन गॅसच्या ग्राहकांच्या सिलिंडर ऑर्डर्स कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर 'ऑटो कॅन्सल' होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मनमानीमुळे अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने धरणगाव तहसील कार्यालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी शिष्टमंडळाने नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पुरवठा अधिकारी श्रीमती रेवणा कांबळे तसेच फौजदारी लिपिक गणेश पवार यांची भेट घेऊन ग्राहकांच्या गॅस ऑर्डर्स वारंवार रद्द होण्यामागील कारणांची सविस्तर माहिती मागितली. तसेच गॅस वितरणातील अडचणी तातडीने दूर करून ग्राहकांना नियमित व सुरळीत गॅस पुरवठा करण्याची ठाम मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या गॅस पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी तात्काळ दूर न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. यावेळी शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख (रावेर लोकसभा व नंदुरबार) गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, नगरसेवक परमेश्वर महाजन, लक्ष्मण माळी, सुनील चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, युवासेनेचे विनोद रोकडे, रमेश चव्हाण, विलास पवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


