ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा;विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध योगासने करत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी योगाची विविध आरोग्यदायी आसने प्रत्यक्ष करून दाखवली.यामध्ये सूर्यनमस्कार,ताडासन, त्रिकोणासन,वृक्षासन,भुजंगासन आणि वज्रासन यांसारखी कठीण व महत्त्वाची आसने शिक्षकांनी केली आणि त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनुलोम-विलोम,कपालभाती हे प्राणायाम आणि विविध योगासने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केली.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून ती एक जीवनशैली आहे. नियमित योगासने केल्याने मानसिक शांतता लाभते,एकाग्रता वाढते आणि शरीर निरोगी राहते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच रोजच्या जीवनात योगाचा समावेश करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी योगसाधनेमुळे होणाऱ्या विविध फायद्यांची सविस्तर माहिती विद्यार्थी व शिक्षकांना दिली.
या यशस्वी कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या प्राचार्या निना कटलर,व्हाईस प्रिंसिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,योग शिक्षिका अनघा पाटील,वृषाली गाडगीळ,सोनाली मुजूमदार, श्वेता जोशी,अर्चना कापूरे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचालन सोफीया पीबॉडी यांनी तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.

फोटो कॅप्शन - भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये योग दिनानिमित्त योगा करताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत वृषाली गाडगीळ,अनघा पाटील,श्वेता जोशी,अर्चना कापुरे आदी.