भुसावळ (प्रतिनिधी) -शहरातील शांतीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा आणि वीजेच्या अतिदाबाच्या समस्येने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, एसी आणि इतर महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होत आहेत. परिणामी, स्थानिकांना नाहक मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

शांतीनगर येथील एन. के. नारखेडे प्राथमिक शाळेसमोरील मुख्य रस्त्यावरील वीज वाहक तारांमध्ये झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर अडकल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे या
फांद्यांचा तारांना स्पर्श होऊन वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत आहेत. तसेच, अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या पदरमोड करून तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना केली असली तरी, महावितरण प्रशासन या मूळ समस्येकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वीज तारांना स्पर्श करणाऱ्या आणि शॉर्टसर्किटला कारणीभूत ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी.
परिसरातील ‘हाय-लो व्होल्टेज’ची समस्या कायमस्वरूपी सोडवून अखंड व सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या वीज तारांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नुकसानासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भाष्य करणे टाळले.
सध्या शहरातील विविध भागांत वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या परिसरामध्ये वीज तारांना जास्त धोका आहे, त्या भागाची पाहणी करून लवकरच योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
अजय गावंडे, सहायक अभियंता,
महावितरण


