भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुनसगाव व बेलव्हाळ परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली असून, बंद पडलेली भुसावळ–बेलव्हाळ एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या सेवेसाठी आमदार ना. संजयभाऊ सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुनसगाव व बेलव्हाळ येथील ग्रामस्थांनी बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार बेलव्हाळचे सरपंच पती जितेंद्र खाचणे आणि सुनसगावचे सरपंच पती भोजराज कोळी यांनी भुसावळ एसटी डेपोचे व्यवस्थापक राकेश शिवदे यांना निवेदन सादर केले होते. तसेच या संदर्भात ना. संजयभाऊ सावकारे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला होता.
या मागणीची दखल घेत भुसावळ आगार प्रशासनाने भुसावळ–बेलव्हाळ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामीण व गरजू नागरिकांसाठी प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. पत्रकार जितेंद्र काटे यांनीदेखील ना. सावकारे यांच्याशी संपर्क साधून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
सध्या भुसावळ येथून सकाळी ९ वाजता आणि दुपारी ३ वाजता अशा दोन वेळा बससेवा सुरू करण्यात आली असून, नागरिकांकडून या सेवेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बससेवेचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, लवकरच वांजोळा–गोंभी–सुनसगाव मार्गे बेलव्हाळ एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मार्गाची पाहणी भुसावळ आगार व्यवस्थापकांनी केली असून, सुनसगाव ग्रामपंचायतीमार्फत निवेदन दिल्यानंतर १५ जूनपूर्वी ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील वाहतूक सुविधेला चालना देणारा हा निर्णय ठरला असून, यासाठी ना. संजयभाऊ सावकारे यांनी विशेष प्रयत्न केल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


