पुणे – पुण्यात गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. पुण्यातील गंगानगर परिसरात तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून झाल्याचे समोर आलं आहे. भर रस्त्यात तडीपार गुंडाची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुंडाच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

पुण्यात पुन्हा गुंडांचा हैदोस पाहायला मिळत आहे. गुंड भर रस्त्यात एकमेकांवर हल्ले करू लागल्याचे समोर येत आहे. गुंडगिरीतील वर्चस्व इ वादातून राणा कांबळे नावाच्या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. राणा कांबळे हा गेल्या अनेक महिन्यांपासून तडीपार होता. त्याची पुण्यातील गंगानगर परिसरात दहशत होती. कांबळेच्या विरोधात गंभीर गुन्ह्यासह चोरी आणि मारामारीचे गुन्हे दाखल होते. राणा कांबळेच्या हत्येने गंगानगरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गंगानगरमध्ये ओम मोरे आणि राणा कांबळे याच्यात वाद झाला होता. या वादानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेला रस्त्यात गाठलं. ओम मोरे आणि त्याच्या साथादाराजवळ कोयते होते. त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेवर हल्ला केला. तिघांनी केलेल्या राणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात राणा रस्त्यावरच कोसळला. तिघांच्या जीवघेणा हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला.


