नाशिक रोड : राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे पाच लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्या आरोपीला नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.

फिर्यादी ज्योती हनुमंत भारती (रा. ठाणे) या २८ जानेवारी रोजी नांदेड ते ठाणे असा राज्यराणी एक्सप्रेसच्या एसी कोचमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांची पर्स चोरीस गेली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, झुमके, अंगठी, रोकड आणि सॅमसंग कंपनीचा अल्ट्रा मोबाईल असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय केदारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान रोहित मारूती दुवेवार (रा. नांदेड) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरीतील सोने आरोपीचा मित्र नामदेव आनंदराव मुंडकर (रा. नांदेड) याने विकत घेतल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ निरीक्षक नविन प्रताप सिंह, पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे यांच्यासह , संजय केदारे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, रघुनाथ सानप, आरपीएफचे लक्ष्मण वाघ,सागर वर्मा या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.


