भुसावळ (प्रतिनिधी)- तहसील कार्यालयाने जनगणना प्रक्रियेच्या तयारीला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला गुरुवारपासून (दि.२३) सुरुवात झाली. जनगणना कामकाज सुरळीत व अचूकपणे पार पाडण्यासाठी प्रगणक व सुपरवायझर त्यात सहभागी झाले आहेत.

तालुक्यात एकूण २६८ प्रगणक व सुपरवायझर आहेत. त्यांचे सहा तुकड्यांमध्ये विभाजन केले आले आहे. त्यापैकी पहिल्या दोन तुकड्यांचे प्रशिक्षण २३ ते २५ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. उर्वरित तुकड्यांचे प्रशिक्षण२७ ते २९ एप्रिल आणि ४ ते ६ में दरम्यान होईल. या प्रशिक्षणासाठी आयटीआय प्रशिक्षक हरीशकुमार पाने, ग्राम महसूल अधिकारी सुनील कचगुंडे व रोशन कापसे तसेच अभय तनकर यांची जिल्हास्तरीय फिल्ड ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणकांना जनगणनेच्या विविध बाबींचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. भुसावळ तालुक्यात पालिका क्षेत्र वगळता संपूर्ण ग्रामीण भागाचा समावेश आहे. या भागासाठी तहसीलदार नीता लबडे
यांच्या मार्गदर्शनाखाली २०० एचएलबी तयार केले आहेत. प्रगणक, सुपरवायझर व राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण २६८ जणांचे प्रशिक्षण तहसील कार्यालयामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने घेतले जात असल्याची माहिती नायब तहसीलदार पूजा अवघडे यांनी दिली. शहरी भागातील प्रगणकांचा सुद्धा गुरुवारपासून तीनदिवसीय प्रशिक्षण वर्ग झाला आहे. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यानी सेंट अॅलायसेस हायस्कूलमध्ये मार्गदर्शन केले, अचूक कामासाठी मास्टर्स ट्रेनर्स टिप्स देत असून चार प्रशिक्षकांनी प्रगणक व सुपरवायझर यांना माहिती दिल्याचे जनगणना कक्ष प्रमुख वैभव पवार यांनी सांगितले.


