भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील शांती नगरात सकल हिंदू समाजातर्फे येत्या मंगळवार (दि.२८) सायंकाळी ७ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. बदलत्या काळात सनातन धर्मासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा समाजाला बोध व्हावा, तसेच धर्मरक्षणाबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.

या संमेलनामध्ये जातीभेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी ७ वाजता सामूहिक शंखनाद करण्यात येईल. या माध्यमातून धर्मजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पुंजाजी महाराज, तर राजेंद्रसिंह बुडवाल हे प्रमुख पाहुणे असतील. ते गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा भुसावळचे सचिव आहेत. याशिवाय डॉ. राम देशमुख हे मार्गदर्शन करतील. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. ते विद्याभारती विदर्भचे माजी अध्यक्ष आहेत. हा कार्यक्रम एन. के. नारखेडे (पत्री शाळेजवळ) चौफुली येथे आयोजित केला आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. यामुळे समाजामध्ये एकात्मता, धर्मनिष्ठा आणि कर्तव्यभावना वाढीस लागेल, असे आयोजकांनी सांगितले.


