भुसावळ (प्रतिनिधी) – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली. निष्ठावंत अनुभवी जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा आणि जिल्हा समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी दिली.

पक्षाने निष्ठावंत आणि जुन्या शिवसैनिकांचा सन्मान राखत नव्या पिढीला देखील संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुभाष हरी पाटील या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्याला तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच शिक्षक सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन निळे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत युवा सेनेतील कडवट शिवसैनिक हेमंत बरहाटे यांनाही तालुकाप्रमुख पदाची संधी देण्यात आली आहे.
शहर पातळीवरही तरुण नेतृत्वाला प्राधान्य देत गणेश चौधरी यांच्याकडे शहरप्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सामाजिक समतोल राखण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी मकबूल मेंबर यांना उपतालुका संघटक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
याशिवाय शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देत चोपडा-यावल परिसरासाठी गोपाळ चौधरी यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच तोरण महाजन (विधानसभा क्षेत्र प्रमुख), अनिल महाजन (तालुका संघटक), संजय असलकर (तालुका समन्वयक), सुनील भोई (वरणगाव शहर प्रमुख), तरुण महाजन (विधानसभा क्षेत्र प्रमुख), कृष्णा पाटील (उपतालुका संघटक, पिंपळगाव), विशाल सूर्यवंशी आणि रमाकांत पाटील (जिल्हा परिषद गटप्रमुख) यांना विविध पदांची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकटपणे उभा राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


