भुसावळ नगरपरिषदेत विकास कामांवरून आरोप-प्रत्यारोप; राजकीय वातावरण चांगलेच तापले :

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील नगरपरिषदेत विकासकामांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप गटाच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी नगरसेवकांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर गंभीर आरोप केले.

पत्रकार परिषदेत बोलताना नारखेडे यांनी सांगितले की, आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. या हस्तक्षेपामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडली असल्याचा आरोप त्यांनी केला.

भुसावळ शहराच्या विकासासाठी आमदार सावकारे यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर व पूर्ण झाली असल्याचे नमूद करत, सध्या सुरू असलेल्या कामांनाही अडथळे आणले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही कामांमध्ये आर्थिक लाभ होत नसल्याने ती जाणीवपूर्वक थांबवली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, या आरोपांमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.