जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल : करिश्मा नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, मीनल करणवाल यांची मुंबईत बदली

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातून उशिरा रात्री या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मीनल करणवाल यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले. ग्रामीण विकासाला गती देणारे निर्णय, तसेच प्रशासनात शिस्त आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या बदलीच्या बातमीमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दरम्यान, करिश्मा नायर यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा तरुण आणि तडफदार महिला अधिकारी लाभल्या आहे. २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या नायर यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी घेतली आहे. त्यांनी यापूर्वी प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

२ एप्रिल २०२५ पासून त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.