शिवमहापुराण कथा : प्रदीप मिश्रा यांचा कथेसाठी आलेल्या भाविकांना सल्ला : जोपर्यंत कुटुंब व नात्यांमध्ये षडयंत्र, तोपर्यंत कामाचे नाही कोणतेही यंत्र ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या अनेक जण वेगवेगळे यंत्र घरात ठेवतात. तरीही सुख – शांती प्राप्त होत नाही. घरातील कलह थांबत नाहीत. घर आणि नात्यांमध्ये षडयंत्र असतील तर ही यंत्रे कसे काम करतील? त्यामुळे आधी षडयंत्र बंद करा. नंतर घरात ठेवलेले हे सर्व यंत्र काम करतील. तसेच सर्व करुनही गृहदोष व दशा बदलत नसेल तर स्वतः बदला, असा सल्ला कथेच्या सहाव्या दिवशी सिहोरवाले पं. प्रदीप मिश्रा यांनी दिला.

अकलूद शिवारातील श्री शिवमहापुराण कथेचा रविवारी सहावा दिवस होता. त्यात पं. मिश्रा यांनी भगवान शंकराचा महिमा वर्णन केला. ते म्हणाले की, परीक्षेत यश मिळवण्यासाठी मध लावलेले बेलपत्र महादेवाला अर्पण करा. सोबतच अभ्यास करा. चारपटीने मेहनत व भगवान महादेवाची भक्ती करा. यामुळे परीक्षेत यश मिळेल. भगवान शंकराच्या भक्ताची कधीही निंदा करु नका. कारण शिव स्वतःचा अवमान सहन करु शकतात, पण भक्ताची निंदा सहन करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

कथा सांगणे सोपे, स्वतः आचरणात आणणे मात्र कठीण

हजारो भाविकांनी मंडपाबाहेर उन्हात बसून श्रवण केली कथा

रविवारी सकाळी कथामंडप हाऊसफुल्ल झाला. यामुळे हजारो भाविकांनी उन्हात बसून कथा श्रवण केली.

मंदिराची स्वच्छता करून वाढदिवस साजरा करा

महागडे केक आणून बर्थ डे, लग्नाचे वाढदिवस साजरे केले जातात. हे मंगलमय क्षण साजरे करा, पण वेगळ्या पद्धतीने. वाढदिवसाला केकवर खर्च करण्याऐवजी त्यातून रंगाची बादली घ्या. गावातील जुन्या मंदिराची स्वच्छता व रंगरंगोटी करा. श्रमदान करुन मंदिराची स्वच्छता करण्याचा सल्ला पं. मिश्रांनी दिला.

दोषमुक्त होऊन होते प्रदोषाचे व्रत सार्थक

आपल्या दोषांना समाप्त कराल तेव्हा प्रदोषाचे व्रत सार्थकी लागेल. मी संताप करणार नाही, व्यसन करणार नाही अशा अनेक दोषांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. हे दोष समाप्त कराल तेव्हाच प्रदोषचे व्रत सार्थकी लागेल. मानवी शरीराने सर्व दोषांवर नियंत्रण मिळवले तर नक्कीच परमात्म्याची प्राप्ती होईल, असे पं. मिश्रा म्हणाले.

नवीन संकल्पांची रुजवात आणि अंमलबजावणी करा

गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरु होते. यावेळी नवीन संकल्प, नवीन विचारांची रुजवात करावी. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी. आपण एका वर्षात ५० नवीन मित्र बनवतो. पण एका मित्रासोबत ५० वर्षे मैत्री निभवणे कठीण आहे. यामुळे नवीन काही करण्यासोबतच भक्तीची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन पं. मिश्रा यांनी केले.

प्रवचन देणे, कथा सांगणे सोपे आहे. पण, कथाकारालाही कथा आपल्या जीवनात उतरवणे कठीण आहे. महाशिवपुराण, गिता, भागवत गिता, विष्णू पुराण, रामचरित मानस अशी कोणतीही पुराणे वाचा, किमान यापैकी एकातरी पुराणाचा अर्धा बोध स्वतःमध्ये उतरवा, तेव्हाच ती व्यक्ती इतरांना कथा सांगण्यासाठी पात्र होते.

गेल्या मंगळवारपासून (दि. १०मार्च) सुरु असलेल्या कथेत रविवारी रात्री महाशिवरात्री साजरी करण्यात आली.

जागा साभाळण्यासाठी तास आधीच मंडप फुल्ल

अकलूद शिवारातील शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशी सुमारे तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. रविवारी सुटीचा दिवस आणि सोमवारी कथेचा समारोप होणार असल्याने ही गर्दी वाढली. अनेक भाविकांनी सकाळी ७ वाजेपासून कथा मंडप गाठला. ११ वाजेनंतर मंडपात पाय ठेवायला जागा नव्हती. ज्या भाविकांना जागा मिळाली नाही, त्यांनी तळपत्या उन्हात मंडपाबाहेर ठिकठिकाणी सावलीची व्यवस्था करून दुपारी २ ते ५ या या वेळेत कथा श्रवण केली.

रविवारी कथेची वेळ नेहमीप्रमाणे दुपारी २ ते ५ अशी होती. मात्र, मंडपात भाविकांनी जागा मिळवण्यासाठी सकाळी ७ वाजेपासूनच कथास्थळ गाठणे सुरू केले, त्यामुळे हळूहळू दुपारी १२ वाजेपर्यंत तीन मुख्य डोम, सुमारे दोन हजार सिलिंग मंडप हाऊसफुल्ल झाले. यानंतर आलेल्या भाविकांना मंडपात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. यामुळे त्यांनी मोठे रुमाल, कापड, छत्र्या व अन्य साहित्य वापरुन सावलीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती

बाजारात शुकशुकाट

शिवमहापुराण कथेचा मोठा परिणाम रविवारी भुसावळातील आठवडे बाजारात जाणवला. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारात वर्दळ होती. नंतर बहुतांश भाविकांनी कथास्थळ गाठल्याने आठवडे बाजारात दुपारी चक्क शुकशुकाट होता. कथा संपल्यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतर ग्राहकांची गर्दी वाढली.

शिवमहापुराण कथेला रविवारी भाविकांची भरगच्च उपस्थिती होती. सकाळी ७ वाजेपासून भाविकांचे आगमन झाले. ११ वाजेपर्यंत मंडपात तुडूंब गर्दी होती.

मंत्री महाजन यांची हजेरी

दुपारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थिती दिली. नंतर महाआरती झाली.

तीन तासांनी मोकळा झाला रस्ता

कथास्थळाकडे जाणाऱ्या फैजपूर मार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पायी चालणं कठीण झाले होते. दुचाकीस्वार कथास्थळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतुकीचा ताण वाढला. कथा संपल्यानंतर संपूर्ण वाहतूक मोकळी होण्यासाठी किमान तीन तास लागले.

सीसीटीव्ही माध्यमातून गर्दीवर लक्ष

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त आरसीपी प्लॉटून तैनात कली होती. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. मनुष्यबळासोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. उद्या समारोप असल्याने गर्दी वाढू शकते. केदार बारबोले, डीवायएसपी

तापी काठावर कुंभमेळा असल्याची आली अनुभूती

अकलूद शिवारातील शिवमहापुराण कथास्थळी मुक्कामी असलेल्या भाविकांची पहाटे ५ वाजेपासूनच लगबग सुरू होते. शेकडो महिला-पुरुष भाविक हातात आंघोळीच्या कपड्यांचे गाठोडे, बादली आणि दातवण घासत कथा स्थळापासून तीन किमी पायपीट करत स्नानासाठी तापी नदी गाठतात, भाविकांच्या या जथ्थ्याला पाहून जणू एखाद्या मोठी वारीची आणि तापी काठावर कुंभमेळा असल्याची अनुभूती येते.

प्रतापी पुलाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक पावलासोबत श्री शिवाय नमस्तुभ्यंम् हा मंत्र म्हटला जातो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासोबत साधल्या जाणाऱ्या संवादाची सुरुवात या मंत्रानेच होत होती. यानंतर मारुती मंदिराजवळ भाविकांची मोठी गर्दी दिसली. तेथून खाली नदी पात्रात उतरून भाविक पवित्र स्नान करत होते.

भाविकांनी घेतला रिक्षांचा आधार

पहाटेच्या वेळी झालेली गर्दी आणि त्यातून वाट काढताना वृद्ध भाविकांना वेळ लागत होता. त्यामुळे अनेक रिक्षाचालक कथा स्थळ ते तापी नदीपर्यंत प्रत्येक व्यक्ती केवळ १० रुपये भाडे घेऊन ये जा करण्यास मदत करताना दिसले, स्थानिक विक्रेते पहाटेपासून दुकाने उघडतात. यामुळे भाविकांना स्नानानंतर वाफाळलेल्या चहाचा आनंद घेता येतो.

मुक्कामी भाविक झाले वातावरणासोबत एकरुप

१० मार्चपासून कथास्थळी मुक्कामी असलेले भाविक आता तेथील वातावरणाशी एकरूप झाले आहेत. रावेर, यावल, चोपडा, ब-हाणपूर, मुक्ताईनगर, दहिगाव, अमळनेर, मलकापूर, जामनेर तालुका, जळगाव, धरणगाव या भागांतून आलेल्या महिलांनी सांगितले की, पहाटे लवकर उठून तापी नदीवर स्नान करणे आणि त्यानंतर कथेसाठी आसन ग्रहण करणे यात एक वेगळाच आनंद आहे. केवळ बाहेरगाच चे व लांब अंतरावरील भाविकच नव्हे, तर शेकडो भुसावळकरांनी सुद्धा कथास्थळी मुक्काम केला आहे. त्यात रविवारी देखील हजारो भाविकांची गर्दी होती