भुसावळ विभागाचा विक्रम; १०० टक्के गाडी वक्तशीरपणात भारतीय रेल्वेत प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी) –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गाडी वक्तशीरपणात ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय रेल्वेतील ६९ विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. १३ मार्च २०२६ रोजी धावलेल्या सर्व १७३ गाड्या वेळेवर धावल्याने विभागाने १०० टक्के वेळपालनाचा विक्रम नोंदवला.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १३ मार्च २०२६ रोजी गाडी वक्तशीरपणात उल्लेखनीय यश मिळवत भारतीय रेल्वेतील ६९ विभागांमध्ये प्रथम स्थान मिळवले. त्या दिवशी नियोजित प्रादेशिक अंतर ५४,०६७.२५ किमी तर नियोजित धावण्याचा वेळ ५४,०७४ मिनिटे होता. इंटीग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टीम (ICMS) मध्ये नोंद असलेल्या १७३ गाड्यांपैकी सर्व गाड्या वेळेवर धावल्याने १०० टक्के वक्तशीरपणाचा परिपूर्ण विक्रम नोंदवण्यात आला.

भुसावळ विभागाचा हा आकडा दुसऱ्या क्रमांकावरील जोधपूर विभागाच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहे. तसेच हुबळी, राजकोट आणि भावनगर या विभागांच्या एकत्रित गाड्यांच्या संख्येपेक्षाही तो जास्त आहे. भारतीय रेल्वेमध्ये एखाद्या विभागाने चालविलेल्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येतील हा ११वा सर्वाधिक आकडा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

भुसावळ विभागाच्या इतिहासात प्रथमच विभागीय स्तरावर १०० टक्के वक्तशीरपणाचा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वीचा ९८.३२ टक्के वेळपालनाचा विक्रम ११ मार्च २०२६ रोजी नोंदविण्यात आला होता. त्यामुळे हा विभागासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

विभागीय तसेच झोनल स्तरावर उत्कृष्ट वेळपालन राखत भुसावळ विभागाने मध्य रेल्वेला भारतीय रेल्वेच्या १७ झोनल रेल्वेमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च महिन्यात ३, ५, ११ आणि १३ मार्च रोजी झोनल स्तरावर १०० टक्के वेळपालन नोंदवण्यात आले आहे.

दररोज सरासरी १७० पेक्षा अधिक मेल व एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक होत असल्याने गाडी संचालनाचे व्यवस्थापन अत्यंत आव्हानात्मक ठरते. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मोठ्या संख्येमुळे कंट्रोलर्सना गाड्यांवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवावे लागते.

ऑपरेटिंग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्यासाठी “मानसिक सज्जता” निर्माण करण्यात आली आहे. तसेच वक्तशीरपणासाठी “शून्य सहनशीलता धोरण” अवलंबले गेले आहे.

सध्या मध्य रेल्वेने एकूण ९२ टक्के वेळपालनाची नोंद केली असून प्रवासी वाहतूक व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह करण्यासाठी आणि वेळपालन सुधारण्यासाठी सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.