भुसावळ (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या क्रीडा प्रगतीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले.
सद्यस्थितीत भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशाचे नाव उंचावत आहेत. सरकारकडून महिलांना विविध सुविधा व प्रोत्साहन दिले जात असून अनेक महिला खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होत विजय मिळवत आहेत, असे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक वार्डातील ओपन स्पेसमध्ये व्यायामासाठी आवश्यक साहित्य व बगीचे तयार केले जात आहेत. मात्र या ठिकाणी स्त्री-पुरुष, मुले-मुली सर्वजण एकत्र येत असल्यामुळे अनेक मुलींना किंवा महिलांना सराव व व्यायाम करताना संकोच वाटतो. त्यामुळे प्रत्येक वार्डातील किमान एक ओपन स्पेस महिलांसाठी स्वतंत्रपणे राखीव ठेवून तेथे आधुनिक व्यायाम साहित्य, मैदान व व्यायामशाळा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच शहरी व ग्रामीण भागातील मुलींच्या शाळांमध्ये सुसज्ज व्यायामशाळा उभारणे, ग्रामीण भागात मुली व महिलांसाठी स्वतंत्र खेळाची मैदाने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात अधिक महिला खेळाडू घडण्यास मदत होईल.
महिलांसाठी राखीव असलेल्या पोलीस, सैन्य, वनविभाग यांसारख्या शासकीय सेवांमध्ये शारीरिक चाचणी महत्त्वाची असते. त्यामुळे अशा सुविधांचा महिलांना मोठा फायदा होऊ शकतो. योग्य प्रशिक्षण व सुविधा मिळाल्यास भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक पदके जिंकून देशाचे नाव उंचावतील, असा विश्वासही डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.



