भुसावळ (प्रतिनिधी )- रंगमंचावर काम करण हे सिनेमात काम करण्यापेक्षाही अवघड आहे. त्यातही युवकांना नाट्य संस्कृतीकडे वळविण्याचे अवघडकाम उत्कर्ष कलाविष्कार करीत आहे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे असे मत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले. येथील श्री कृष्णचंद्र सभागृहात आयोजित १७ व्या खान्देश नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पहिल्या दिवशी जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ‘पालखी’ हे नाटक शिस्तबद्ध अभिनयाने चांगलेच गाजले.
ओबेनॉल फाउंडेशन प्रायोजित उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यात विविध प्रकारची प्रायोगिक नाटके रसिकांना विनामूल्य दाखवली जातात. यंदा महोत्सवाचे १७ वेळ वर्ष असुन काल रात्री त्याचे उद्घाटन झाले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, ओबेनॉल फाउंडेशनचे संस्थापक अश्विनकुमार परदेशी, अध्यक्षा नम्रता परदेशी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बज्म ए इर्तेका सोसायटीचे अध्यक्ष शकील हसरत, गायक संघपाल तायडे, उत्कर्षचे अध्यक्ष अनिल कोष्टी व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री सावकारे पुढे म्हणाले रिटेक व आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः ए.आय. मुळे सिनेमात काहीही दाखवणे शक्य आहे. नाटकात तसे नसते. आजच्या पिढीला अभिनय म्हणजे नेमके काय हे कळणे आवश्यक आहे. त्यासाठी रंगमंच महत्त्वाचा आहे. मला देखील नाटकाची आवड आहे. मुंबईत नोकरी लागली तेव्हा मी सिनेमापेक्षा नाटकच जास्त पाहायचो. भुसावळची ओळख सांस्कृतिक क्षेत्र म्हणून आहे. या शहरातील नाटकाची परंपरा उत्कर्ष सारख्या संस्थांनी जीवंत ठेवली आहे. असे सावकारे म्हणाले.
यावेळी पोलीस विभागातील कर्मचारी व गायक संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक केले तर सन्मानपत्राचे वाचन प्रेरणा देशमुख हिने केले. सुशील पाटील यांनी सुत्रसंचलन केले.
या नंतर शहरातील कलाप्रेमी डॉक्टर व कला शिक्षकांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सावकारे यांच्या हस्ते झाले. यात डॉ विकास कोळंबे, डॉ श्वेता सरोदे, राजेंद्र जावळे, मनोहर झांबरे, कुलदीप पाटील यांनी काढलेल्या चित्रांचा समावेश होता.
पहिल्या दिवशी जळगावच्या परिवर्तन संस्थेचे दि.बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारीत वारीचा शोध घेणारे शंभु पाटील लिखित व दिग्दर्शित ‘पालखी’ हे नाटक सादर करण्यात आले. सुमारे चाळीस कलावंत या नाटकात होते मात्र अतिशय शिस्तबद्ध व उत्तम अभिनयाने रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले
भुसावळला नाट्यगृह होणार होते पण……
सावकारे दरवर्षी महोत्सवाला येतात तेव्हा नाट्यगृहाचा विषय निघतो. यंदा मात्र प्रास्ताविकात कोष्टी यांनी हा विषय काढलाच नाही. मात्र सावकारे यांनी त्याची आठवण करून दिली ते म्हणाले भुसावळला नाट्यगृह नाही याची खंत नाट्य कलावंतांना आहे. आता मात्र जागा फायनल झाली होती इतर सगळ्या गोष्टी झाल्या होत्या सत्ता आल्यावर काम सुरू करायचे होते पण सगळ पाणी फिरल. पण तरीही आपण सकारात्मक राहु शहरात नाट्यगृह होईल त्यासाठी समोरच्याची मदत घ्यावी लागली तरी ती घेऊ असे सावकारे म्हणाले.

फोटो ओळ…भुसावळ : खान्देश नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे. सोबत मोहन फालक, महेश पालक, रजनी सावकारे, अश्विनकुमार परदेशी, नम्रता परदेशी, शकील हसरत आदी.


