भुसावळ (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत दिनांक १५ मार्च २०२४ रोजी जाहीर झालेल्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या आदेशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करावी, २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्राप्त आक्षेपांवर निर्णय घ्यावा व ३ मार्च २०२६ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र हा कालावधी दहावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच त्यानंतर होणाऱ्या लेखी परीक्षा आणि शालेय वार्षिक परीक्षांचा आहे. अशा ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन केल्यास संबंधित शाळांतील अध्यापन व्यवस्था विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
हा साधा विचारही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी न करणे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. ह. दलाल यांनी व्यक्त केली आहे. ही प्रक्रिया एप्रिल–मे किंवा जून महिन्यात राबवली असती तर काय अडचण निर्माण झाली असती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा व्यक्त करायची आणि दुसरीकडे शिक्षण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम करणारे आदेश द्यायचे, हा स्पष्ट विरोधाभास असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शिक्षण संचालकांनी या आदेशाचा फेरविचार करून ही प्रक्रिया परीक्षेनंतर राबवावी, अशी जोरदार मागणी प्रा. ह. दलाल यांनी केली आहे.



