भुसावळ (प्रतिनिधी)

जबाबदार नागरिक म्हणून मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे, मानवी तस्करीविरोधात ठामपणे आवाज उठवणे व बालविवाह रोखण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने आज ३० जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ॲड नीलेश भंडारी यांनी केले .
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या जानेवारी २०२६ च्या दिनदर्शिकेतील निर्देशानुसार भुसावळ येथील अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला नागरिक संघ येथे हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधी सहाय्यक (PLV) उज्वला बागुल यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अॅड. निलेश भंडारी (रिटेनर लॉयर) व अॅड. जास्वंदी भंडारी यांनी भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिन तसेच “बालविवाह मुक्त भारत” या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाच्या कलम ५१(अ) मध्ये नमूद केलेल्या ११ मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व स्पष्ट करताना, हक्कांसोबत कर्तव्यांचे पालन झाले तरच लोकशाही अधिक मजबूत होते, असे त्यांनी सांगितले.
११ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनाच्या अनुषंगाने मानवी तस्करीचे स्वरूप, तिचे दुष्परिणाम, महिलांवरील अत्याचार व बालहक्कांचे संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. “मानवी तस्करी हा गुन्हा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणेही गुन्हाच आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रास्ताविकात तालुका विधी सेवा समिती व तिच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती PLV उज्वला बागुल यांनी दिली. तसेच बालविवाहाची कारणे, त्याचे गंभीर सामाजिक व आरोग्यविषयक परिणाम आणि शासनाची “बालविवाह मुक्त भारत” मोहीम याबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. “मुलीचे लग्न नाही, शिक्षण द्या — बालविवाहमुक्त भारत घडवा,” असे आवाहन उज्वला बागुल यांनी केले. सूत्रसंचलन सौ डोलारे यांनी केले तर आभार प्रभावती पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, अनेक सामाजिक व कायदेशीर समस्यांबाबत आम्हाला या मार्गदर्शनामुळे मिळाल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित महिलांच्या शंका व समस्यांचे निराकरण अॅड. भंडारी यांनी केले.
कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष सुनंदा औंधकर यांच्यासह अॅड. निलेश भंडारी, अॅड. जास्वंदी भंडारी व PLV उज्वला बागुल व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.


