जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी

मुंबई, ) दि. 29: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

याआधी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून, 7 फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाईल.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत.

या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने दुखवटा जाहीर केला. त्यामुळे उर्वरित निवडणूक कार्यक्रमात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. नव्या वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल.

9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.