जळगाव(प्रतिनिधी ) – बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळते. पदार्थ तयार करणे, त्यांची किंमत ठरवणे, पैसे घेणे-देणे, हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी नम्रपणे बोलणे अशी सर्व कौशल्ये विद्यार्थी अनुभवातून शिकतात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी व्यवहारक्षम, आत्मनिर्भर आणि जबाबदार बनतील, असे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मनोरमाताई पाटील यांनी केले.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन मनोरमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच यशोदाबाई सोनवणे व ग्रा. पं. सदस्य शमाबाई पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक स्टॉलवरील खाद्यपदार्थांची माहिती घेतली, त्यांची किंमत विचारली तसेच अनेक स्टॉलवरून स्वतः खाद्यपदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढावा यासाठी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वंदना पाटील, राजाराम पाटील, डॉ. जगदीश पाटील, विनोद ढाकणे, ज्योती पाखरे, योगिनी महाजन, कैलास परदेशी, संगणक शिक्षिका तब्बसूम सैयद, शाम चिमणकर आदींनी परिश्रम घेतले.
मेळाव्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. भेळ, वडा, उसळ, फरसाण, केक, बिस्किटे, सँडविच, पावभाजी, डोसा, इडली, चटणी, समोसे, भजी, चिवडा, लाडू, चॉकलेट, फळांची चाट, पॉपकॉर्न अशा विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी बोलणे, पैसे हाताळणे, हिशेब ठेवणे, दर ठरवणे आणि सेवा देणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि व्यवहारज्ञान विकसित होत असल्याचे चित्र दिसून आले. बाल आनंद मेळाव्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
फोटो ओळी – बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना पं.स. माजी सभापती मनोरमाताई पाटील सोबत सरपंच यशोदाबाई सोनवणे, ग्रा. पं. सदस्य शमाबाई पिंजारी यांच्यासह शिक्षक.


