शेती व्यवसायात शाश्वती नाही; शेतकऱ्यांनी स्वतःची व्यवस्था उभी करावी – विलास शिंदे ; राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक गौरव

नाशिक | प्रतिनिधी

“शेती हा अत्यंत कष्टाचा आणि अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. त्यामध्ये कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील अडचणी ओळखून आपल्या ताकदीवर आणि कौशल्यावर मार्ग शोधला पाहिजे. आपणच आपली व्यवस्था उभी केली पाहिजे,” असे प्रतिपादन सह्याद्री फार्म्सचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले.

जय किसान फार्मर्स फोरम आणि गोदावरी बायो फर्टिलायझर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘कृषिरत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध जिल्ह्यांतून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, मुंबई आकाशवाणी विविधभारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ. संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सदुभाऊ शेळके, मल्टीमोलचे संचालक शशिकांत शेट्टी, ‘इफको’च्या साधना जाधव तसेच ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ शेतकऱ्यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र, पैठणी साडी व शेतकरी गौरव विशेषांक देऊन सपत्निक सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याची माहिती देत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये यादवराव केशवराव ढवळे, दीपक दगुजी पवार, श्रीराम भानुदास तायडे, निवृत्ती अशोक शिंदे, प्रकाश केशवराव गडदे, गणेश एकनाथ पवार, तेजस नर्सरी, संतोष बाबुराव गवारे, विक्रम बाळासाहेब महाले, सचिन सोनोने, शाम भगवान बन, सय्यद गनीभाई हुसेन, युवराज बाळासाहेब जाधव, गजानन भानुदास परिहार, प्रितम दिलीप शिसोदे, बाळू पंडित बहिरम, अभिमन्यू लक्ष्मण ठाकरे, दत्तू केवजी बागूल, देवराम अनाजी पालवी, बापू वसंत पगार, प्रविण छगन जाधव, अभयसिंह मोहनराव पाटील, राजेश गंगाधर मुसळे, नितीन लक्ष्मण शेवाळे, अनिल भाऊराव देवरे, श्वेता संजय इंगळे, सुनिल दामोधर धात्रक, रमेश पांडुरंग ठोसरे, शिवकृपा ऑनलाइन ई-सेवा आधार केंद्र, नंदिनी महेंद्र जाधव, रोहिदास बापूराव पाटील, पांडव जीवामृत युनिट, युवराज जाधव, समीर शेख व रविंद्र दिनकर जगताप यांचा समावेश होता.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते “आमची माती आमची माणसं” या शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुमधुर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व कलावंत डॉ. तुषार वाघुळदे यांनी शेरोशायरीसह प्रभावीपणे केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, बाळासाहेब मते, निवृत्ती न्याहारकर, सविता जाधव, मयूर गऊल, सागर रहाणे, शाम गोसावी, वसंत आहेर, सुयोग जाधव, राजेंद्र धोंडगे, संकेत लामखडे, अशोक देशमुख, संदीप उफाडे, सुनिल गमे, स्नेहल लामखडे आदींनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब मते यांनी केले.