जळगाव : मंगला एक्स्प्रेस या सुपरफास्ट गाडीला जळगाव स्थानकावर थाबा नसल्याचे माहीत असून देखील जळगाव स्थानकावर गाडीचा ( स्पीड) वेग कमी झाल्याने अन्य प्रवासी उतरले म्हणून उतरण्याचे धाडस करतांना प्रवास करणाऱ्या जळगाव येथील महिलेचा तोल गेला व त्या गंभीर जखमी झाल्या ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अॅड. वर्षा साहेबराव बिऱ्हाडे असे मयत महिलेचे नाव आहे.

अॅड. वर्षा बिऱ्हाडे (वय ४०) भोईटे नगरात आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्याला होत्या. त्यांच्या कुटुंबांत आई-वडील, भाऊ, बहिण व मुलगा यांचा समावेश आहे. जळगाव व कल्याण येथे वकिलीची प्रॅक्टीस करत होत्या. त्या गुरुवारी मुंबईहून मंगला एक्सप्रेसने जळगाव येथे परतत होत्या. मंगला एक्सप्रेसला जळगावला थांबा नाही. ही सुपर फास्ट गाडी जळगाव स्थानकावरून थोडी कमी वेगात जात होती. याच वेळी काही प्रवाशी चालत्या रेल्वेतून खाली उतरले. त्यांचे पाहून अॅड. बिऱ्हाडे ह्या देखील उतरत असताना त्यांचा तोल जावून त्या फलाट क्रमांक ३ वर पडल्या व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला
त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एवढे कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. त्यांच्या मृत्यूमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.


