अध्यात्मिक सायकल वारी ; ५१० किमी सायकल चालवून गाठली पंढरी: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या १४ सायकलपटुंचा अनोखा भक्तिमय प्रवास ” ;

भुसावळ/पंढरपूर : “जय जय राम कृष्ण हरी”च्या जयघोषात भुसावळ येथील १४ सायकलपटुंनी तब्बल ५१० किमी अंतर पार करत पंढरपूर वारी यशस्वीपणे पूर्ण केली.
लाडक्या विठुरायाचे दर्शन व विठोबाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या ओढीने निघालेली ही वारी केवळ सायकल प्रवास नव्हता, तर ती श्रद्धा, सहकार्य आणि निसर्गप्रेमाचा अनोखा संगम ठरली.

वारीची सुरुवात दीपनगर, भुसावळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन पहाटे विठोबाच्या नामस्मरणाने झाली. पुढे जळगाव, फर्दापूर, अजिंठा घाट, संभाजीनगर, मांजर सुभा घाट, भुममार्गे हा खडतर प्रवास करत त्यांनी पंढरपूर गाठलं.
दोन दिवस १९० किमी आणि १३७ किमीचे टप्पे पार करत, तिसऱ्या दिवशी शेवटचा १८५ किमीचा टप्पा पूर्ण करत विठोबाच्या दर्शनाचा क्षण अविस्मरणीय ठरला.

या प्रवासात २४ किमी प्रति तास वेगाने समोरून येणारा वारा, ७७% हेडविंड, तीव्र चढउतार आणि पावसाच्या सरींसह उन्हाच्या झळा – अशा निसर्गाच्या परीक्षा होत असतानाही “पुंडलिक वरदा हरि विठ्ठल”चा गजर प्रत्येकाच्या ओठांवर अखंड सुरु होता.
संपूर्ण प्रवासात जळगाव सायकलिस्ट ग्रुपने भोजन, नाश्ता, हायड्रेशन, मेडिकल किट, सपोर्ट व्हेईकल्सची शिस्तबद्ध व्यवस्था केली.

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय सायकल रिंगण सोहळ्यात हजारो सायकलिस्ट्सनी एकत्र येऊन “सायकल चालवा – पर्यावरण वाचवा”चा संदेश दिला. प्रदक्षिणा, भजन, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठोबाच्या पालखीची अनुभूती घेता घेता ही वारी भक्तिपूर्ण सोहळ्यात परावर्तित झाली.

सदर वारीने सायकलप्रेम, आरोग्यदृष्टी, पर्यावरणप्रेम आणि विठोबाच्या चरणांशी आत्मिक नातं जोडण्याचा अनुभव दिला.
“वारी संपली, पण विठोबाचं नामस्मरण आणि सायकलवरील भक्ती पुढच्या वर्षीही नक्की चालूच राहील,” असा विश्वास सहभागी सायकलिस्ट्सनी व्यक्त केला.
या वारीत सहभागी झालेले सायकलपटू पुढीलप्रमाणे:
प्रवीण फालक,विद्याधर इंगळे,मधुकर इंगळे,मनोज चौधरी,गजानन पाटील, रवी पवार , सोमनाथ जाधव, विश्वनाथ पावरा, समीर चौधरी ,जगदीश रेहपाडे,युवराज सूर्यवंशी, तुषार पोतरवार,मनोज कुमार भालेराव ,भाऊसाहेब पाटील