ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली,

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला विश्वातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांनी 250 चित्रपटामध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, ‘पद्मश्री हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. मी सरकारचे आभार मानतो. तसंच माझ्या कुटुंबाचे, सहकलाकरांचे आणि रसिक प्रेक्षक, चाहत्यांचे सुद्धा आभार मानतो. तुम्ही केलेल्या प्रेमामुळे हे शक्य झालं आहे. तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत राहू द्या.’

या सोहळ्याला अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफसह इतर कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. मनोरंजनसृष्टीतून अशोक सराफ यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. सलील कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सायली संजीव यांनी खास पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचं कौतूक केलय. प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. या यादीत अशोक सराफसह इतर महत्त्वाच्या कलाकारांची सुद्धा नावं होती. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अमित शहासह अनेक मान्यवर उपस्थित होते.