शहिद जवानांच्या पत्नींसाठी एक कोटींची मदत ; सैनिकहो तुमच्यासाठी : अभिनेत्री प्रीती झिंटाचा पुढाकार :

मुंबई,

अभिनेत्री प्रीती झिंटा हिने शहीद जवानांच्या पत्नींसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. तिने आर्मी वाइव्स वेलफेअर असोसिएशनला 1.10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. प्रीती झिंटाने ही मदत तिच्या आयपीएल टीम पंजाब किंग्सच्या सीएसआर उपक्रमातून केली आहे. आपले सैनिक देशासाठी जे बलिदान देतात, त्याची परतफेड होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रीती म्हणाली.

प्रीती नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आता तिने सैन्यातील जवानांच्या पत्नींसाठी आर्थिक मदत केली आहे. हे करत तिने लोकांची मने जिंकली आहेत. देशाच्या जवानांनी देशासाठी केलेल्या योगदानाला तिने सलाम केला आहे. दि. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. यानंतर प्रीती शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रीतीने याबद्दल एक निवेदन जारी केले आहे. ती म्हणाली, ‘आपण आपल्या जवानांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. पण देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या कुटुंबियांना शक्य तेवढी मदत केली पाहिजे.

जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रीती झिंटा हिने सैनिकांबद्दल आपले विचार व्यक्त केले. ती म्हणाली, मला भारतीय सशस्त्र दलाचा खूप अभिमान आहे. मी माझ्या देशासोबत आणि शूर जवानांसोबत नेहमी उभी आहे. प्रीती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने एका यूजरच्या कमेंटला उत्तर देताना सांगितले की, तिने सैनिकांचे जीवन खूप जवळून पाहिले आहे.

कारण ती स्वतः एका सैनिकाची मुलगी आहे. प्रीती झिंटा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ती आयपीएल टीम पंजाब किंग्सची मालकीण देखील आहे. ती नेहमीच सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. आता तिने शहीद जवानांच्या पत्नींसाठी केलेल्या मदतीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.