महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करणार्या आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकार्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे. तसेच पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप करत महाराष्ट्र पोलिसांवर थेट आरोप केले होते.
संजय गायकवाड म्हणाले की, सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवले की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही, तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल, असे गायकवाड म्हणाले.
बुलढाण्यातील दोन पोलिस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा सवाल यावेळी गायकवाड यांनी उपस्थित करीत मुक्ताफळे उधळली होती.


