धुळ्यात बनावट पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेची कारवाई : 300 किलोहून अधिक पनीर जप्त -गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई :

धुळे – धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीत केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून बनावट पनीर तयार करणार्‍या कारखान्यावर छापेमारी करीत सुमारे 300 किलोहून अधिक पनीर जप्त केले. गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे समजते.

300 किलो साठा जप्त
गुढीपाडवा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुध व दुग्धजन्यपदार्थ असलेल्या पनीरसह खवा व मावा आदींना मोठी मागणी पाहता बाजारात बनावट पनीर विक्री होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी भल्या सकाळीच मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीत एका कारखान्यात पथकाने छापेमारी करीत सुमारे 300 किलो पनीरचा साठा जप्त केला.

केमिकलद्वारे पनीर बनवल्याचा संशय
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संशयीत हे फर्टीलायझरसाठी उपयोगी येणार्‍या केमिकलद्वारे पनीरची निर्मिती करीत असल्याचा संशय आहे. शिवाय मिल्क पावडरचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर पनीरची निर्मिती करून त्याची विक्री झाल्याचा संशय आहे. पथकाने घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनासह पशू वैद्यकीय अधिकार्‍यांना तपासणीसाठी पाचारण केले आहे.


अन्न व औषध प्रशासनाकडून घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या पनीरचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील व त्यात पनीरचे हानीकारक केमिकल्सचे अंश आढळल्यास अहवाल येताच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले.

बनावट पनीर संदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच बनावट पनीर संदर्भात भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतर बैठक बोलावत बनावट पनीर संदर्भात कारवाईचे एफडीए विभागाला निर्देश दिले होते.

राज्यात सर्रास वापरल्या जाणार्‍या या पदार्थाने आरोग्यास धोका निर्माण झाला असून विक्रमसिंह पाचपुतेंनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते.