मराठी भाषेचा अभिमान बाळगणे काळाची गरज आहे – प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे.


भालोद (प्रतिनिधी ) – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास केंद्र यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मराठी साहित्यातील दीपस्तंभ, प्रतिभा संपन्न साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा तसेच मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. कोल्हे म्हणाले “मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तसेच जगातील कानाकोपऱ्यात बोलली जाणारी भाषा आहे

. विशेषतः तेराव्या शतकापासून नावारूपाला आलेली मराठी भाषा आज ग्रंथरूपाने समृद्ध झालेली आहे. मराठी भाषेत चार साहित्यिकांना सर्वोच्च असे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. अशा माय मराठीचा सन्मान व अभिमान सदैव बाळगावा.” याप्रसंगी मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिनेश पाटील यांनी मराठीची व मराठी साहित्यिकांची गौरवशाली परंपरा मांडली. “मुकुंदराजांच्या विवेक सिंधू या ग्रंथापासून लिखित स्वरूपात अस्तित्वात आलेली मराठी भाषा ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामादी संतांनी जनमानसात पोहचवली. तसेच विविध भक्ती संप्रदायांच्या अनुयायांनी नेहमीच मराठीचा स्वाभिमान बाळगलेला आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेत.