अतिक्रमण व कर न भरणे भोवले, मुक्ताईनगर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र ;


मुक्ताईनगर, – ग्रामपंचायत सदस्य असताना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामपंचायतीचा कर न भरल्याने नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य या दोघांना जिल्हाधिकारी आयुष प्रासद यांनी अपात्र घोषित केले आहे.

अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गोपाळ कृष्णा न्हावी यांनी सरकारी जागेवर विनापरवानगी बेकायदेशीर अतिक्रमण करून पक्के राहते घराचे बांधकाम केल्याने या संदर्भात महेश दत्तू पाटील, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर. जिल्हा जळगाव. यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली होती. या तक्रारीवर सुनावणी सुरू होती. सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल देवून गोपाळ कृष्णा न्हावी ग्रामपंचायत सदस्य नायगाव, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर याना अपात्र घोषित केले आहे.

तर दुसरे नायगाव ग्रामपंचायत सदस्य भगवान चुडामण भिल यांनी गेल्या २०२२ – २३ ते २४ ची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कराची थकबाकी आज पावेतो ग्रामपंचायतीत कर भरला नसल्याने महेश दत्तू पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू होती. यावर सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल देवून भगवान चुडामण भिल, ग्रामपंचायत सदस्य नायगाव, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर याना अपात्र घोषित केले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या निकालात
गोपाळ कृष्णा न्हावी ग्रामपंचायत सदस्य नायगाव, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर आणि भगवान चुडामण भिल, ग्रामपंचायत सदस्य नायगाव, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर या दोघांना अपात्र घोषित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.