जळगाव ;

घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याचा प्रकार जळगाव शहरातील पिंप्राळा येथील वखाराजवळ उघड झाला. याप्रकरणी एका तरुणावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कारवाई करून ५ गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे इतर साहित्य असा ७४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा वखारजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता चार ठिकाणी छापा टाकला. यात कारवाईत संशयित आरोपी वसीम चंगा शहा (वय २७) अखलाख खान जहांगिर खान (वय २९) फिरोज अलाउद्दीन शेख (वय २२) आणि जुबेरखान उस्मानखान पठाण (वय-३२) सर्व रा. पिंप्राळा जळगाव या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून त्याच्याजवळ असलेले घरगुती गॅसचे ११ सिलेंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण २ लाख १ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करीत आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या सुचनेनुसार आणि एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, पोलीस चालक भरत पाटील यांच्यासह रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, इरफान मलिक यांनी कारवाई केली आहे.


