भुसावळ : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचे तालुक्यात हजारो अर्ज भरण्यात आले होते. त्याचा लाभही बहिणींना मिळाला. या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांनादेखील सहभागी करून घेण्यात आले होते. या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. मात्र, बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊनही ४०० अंगणवाडी सेविकांना अजूनही भत्ता मिळालेला नाही. हा भत्ता मिळणार कधी, याकडे सेविकांचे लक्ष लागून आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून ५० रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात सांगण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांना अद्यापही त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविकांनीही अर्ज भरले आहेत. मात्र, अजूनतरी त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तर अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता.




