समाजातील विघातक प्रवृत्तींवर प्रहारासाठी साहित्यिकांनीही लेखणीची धार तीव्र करावी : हिंदी साहित्य गंगाच्या बहुभाषिक महाेत्सवात तज्ज्ञांचा सूर :

जळगाव : समलैंगिकता ही म्हटलं तर एक विकृती आणि विनाशाचा मार्ग आहे. देशात झपाट्याने वाढणारे समलैंगिक संबंधांचे प्रमाण मेंदू बधीर करणारे आहे. अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढताहेत. शिक्षणाचे बाजारीकरण, व्यापारीकरण हाेत आहे. यासह समाजातील विघातक प्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी चिकित्सक अभ्यास करून साहित्यिकांनी लेखणीची धार तीव्र करायला हवी, असा सूर हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या बहूभाषिक साहित्य महाेत्सवात तज्ज्ञांच्या संवादातून निघाला.
जळगाव शहरात ‘रिगल’ सभागृहात हा दाेन दिवसीय साहित्य महाेत्सव आयाेजित करण्यात आला आहे. पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन यांना यंदाचा हा महाेत्सव समर्पित करण्यात आला आहे. महाेत्सवाचे उद‌्घाटन शनिवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुहास गाजरे यांच्या हस्ते झाले. जुनागढचे नटवर चाैकसी, नाशिकचे सुबाेध मिश्रा, जळगावचे मजिद झकेरीया, माजी महापाैर सीमा भाेळे, भारती साेनवणे यांची उपस्थिती हाेती. संयाेजिका डाॅ. प्रियंका साेनी यांच्या गीतसंग्रहाचे व रईसा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यानंतर राष्ट्रीय परिसंवाद झाला. त्यात नाशिकचे सुबाेध मिश्रा यांनी ‘समलैंगिकता वाढीचे समर्थन करावे की नाही?’, नांदेडचे जयप्रकाश नागला यांनी ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणात भारतीय भाषांची भूमिका’, दिल्लीच्या मीना काैशल यांनी ‘समलैंगिकता आणि समाजातील वास्तव स्थिती’ या विषयांवर आपली मते मांडली. समलैंगिकता माणसांत दडलेली एक विकृती आहे. भारतीय संस्कृतीत असले प्रकार मान्य नाहीत. निकाेप समाज व्यवस्थेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकारांना पायबंद घातले पाहिजे. त्यासाठी प्रभावी जनजागृतीची आवश्यकता असल्याचा सूर या परिसंवादातून निघाला. मातृभाषा, राष्ट्रभाषा यांचे संवर्धन करायला हवे. इंग्रजीचा अट्टाहास टाळावा अशी मते देखील मांडण्यात आली.

बहूभाषिक कवीसंमेलन रंगले
महाेत्सवाच्या तृतीय आणि चतुर्थ सत्रात बहूभाषिक कविसंमेलन, मुशायरा रंगला. त्यात सहभागी झालेल्या देशभरातील कविंनी आपल्या रचना सादर केल्या. समाजातील अन्याय, अत्याचार, कृषी, प्रेम, राष्ट्रभक्ती असे विविध विषय कवितांतून मांडण्यात आले. शनिवारी शेवटच्या सत्रात रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगले. त्यात भारतीय संस्कृती, लाेकपरंपरांचे दर्शन घडले.