भुसावळ (प्रतिनिधी) - श्री राजीव श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी जून २०२६ महिन्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि रेल्वेच्या सुरक्षित परीचालनासाठी केलेल्या समयसूचक कार्यवाहीबद्दल 'संरक्षा पुरस्कार' देऊन सन्मानित केले. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि समर्पण वृत्ती यांच्या कौतुकार्थ हे संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले; यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास आणि प्रवासी व रेल्वे परीचालनाची संरक्षा सुनिश्चित करण्यास मदत झाली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट संरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांचा तपशील भुसावळ विभाग (२ पुरस्कारप्राप्त) (१) श्री रवींद्र गणवीर, तंत्रज्ञ, भुसावळ यार्ड, भुसावळ विभाग, दिनांक ०३.०५.२०२६ रोजी नियमित देखभाल तपासणीचे काम करत असताना, त्यांना 'बीओएक्सएनएचएल' प्रकारच्या वॅगनचे ग्रीस सील सैल असल्याचे दिसून आले. ही त्रुटी वेळीच दुरुस्त न केल्यास अपघात होऊ शकला असता. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली आणि वेळेवर कार्यवाही करण्यात आली, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. (२) श्री बळीराम शंकर चौधरी, गेटमन, बडनेरा, भुसावळ विभाग, दिनांक १५.०५.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना, त्यांना तेथून जाणाऱ्या एका मालगाडीच्या चाकाचा अक्ष अतिगरम (Hot Axle) झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित लाल सिग्नल दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी न थांबल्यामुळे, त्यांनी पुढील गेटमनला गाडी थांबवण्यासाठी सतर्क केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली. महाव्यवस्थापकांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या आदर्श निष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे इतर रेल्वे कर्मचारीही प्रवाशांची संरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याबाबत सतर्क व कटिबद्ध राहण्यास प्रेरित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक श्री. प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. चंद्र किशोर प्रसाद, इतर विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



