भुसावळ, ( प्रतिनिधी)– राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगार विविध क्षेत्रातील तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य- शिक्षण विभागांसह इतरही विभागात संधी दिलेली असून अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गरजेची बाब म्हणून अशा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नेमणुका देण्याची मागणी पालक वर्गासह प्रशिक्षणार्थ्यांकडून केली जात आहे.
राज्य शासनाने लाडकी बहीण योजना एसटी प्रवास सवलती शेतकरी आत्म सन्मान योजना सुरू केले असून यासह इतरही लाभाच्या योजना सुरू केले आहेत मात्र त्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. महिला ,शेतकरी, शेतमजूर युवक यांच्यासाठी विविध घोषणा करत रोजगारासह विविध संधी उपलब्ध केल्या जात असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना केवळ फक्त सहा महिन्यांसाठी शासनाच्या विविध विभागात संधी दिलेली आहे. बेरोजगार पदवीधर तरुणांची तसेच आरोग्य शिक्षण विभागांची गरज पाहता यामध्ये असलेली सहा महिन्याची अट काढून टाकावी व त्यांना सुद्धा वरील योजनांप्रमाणे कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे त्याच ठिकाणी नेहमीच सेवाशर्तींमध्ये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे . सहा महिने संधी देऊन बेरोजगारी दूर होणार नाही तर यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा महत्त्वाच्या गरजेच्या ठिकाणी जे पदवीधर बेरोजगार प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी शासनाच्या वतीने नियमित रोजगाराची संधी कायम म्हणून उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
आरोग्य, शिक्षण विभागात आजही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागातील सोयी सुविधांची गरज खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत अत्यावश्यक बाब म्हणून गणली जाते आणि अशा ठिकाणी अनेक जागा रिक्त असल्याचे दिसून येते .
सध्या निवडणुकीच्या काळात सत्ताधारी तसेच विरोधकांकडून मतदारांसाठी नव मतदारांसाठी शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी बेरोजगार पदवीधर यासाठी विविध घोषणा केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत पदवीधर युवकांची गरजेच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे त्यांचा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न सोडून राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल व जनतेलाही जनतेसह विद्यार्थ्यांना आरोग्य, शिक्षण विभागाच्या सोयी उपलब्ध होण्यास मदत होईल निवडणुकीतील उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत केवळ सहा महिन्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य, शिक्षण विभागातील पदवीधर तरुणांना युवकांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे त्या जागेवर नियमित सेवेत उपलब्ध करून देण्याचे आश्वासित घोषणांमधून करावे अशी अपेक्षा पालकांसह प्रशिक्षणार्थी वर्गातून केली जात आहे.



