भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील अनेक जुन्या व कालबाह्य झालेल्या शासकीय गाड्या सध्या निष्क्रिय अवस्थेत पडून असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वाहनांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनांचा तात्काळ लिलाव करून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा करावा, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या अनेक गाड्यांची मुदत संपून त्या कालबाह्य झालेल्या आहेत. सध्या त्या विविध ठिकाणी उघड्यावर पडून असल्याने पावसाळ्यात गंज लागून त्यांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, शासनाच्या मालमत्तेची दैन्यावस्था होत असून त्यातून कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. या वाहनांची अधिक हानी होण्यापूर्वी त्यांचा तात्काळ लिलाव करून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा करावा, अशी मागणी केदारनाथ सानप यांनी केली आहे. तसेच या निवेदनावर होणाऱ्या कार्यवाहीची माहिती देणारी प्रत माहितीस्तव उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर मागणीमुळे निष्क्रिय शासकीय मालमत्तेचा योग्य वापर होऊन शासनाला आर्थिक फायदा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



