रावेर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील SIR-2026 मॅपिंगची चौकशी करण्याची मागणी

रावेर (प्रतिनिधी) - रावेर विधानसभा मतदारसंघातील SIR-2026 (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान काही मतदान केंद्रांमध्ये मतदार मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण संशयास्पदरीत्या जास्त असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी रावेर-यावल विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा BLA-1 विलास चौधरी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात रावेर व यावल तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार मॅपिंग व पडताळणीचे काम अत्यंत मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही विशिष्ट मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण इतर केंद्रांच्या तुलनेत असामान्यरीत्या जास्त असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे सदर प्रक्रियेत समान निकष, एकसमान कार्यपद्धती, पारदर्शकता व निष्पक्षतेबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून वापरण्यात आलेल्या निकषांची, प्रत्यक्ष पडताळणीची वस्तुस्थिती तसेच नोंदविण्यात आलेल्या माहितीची सत्यता तपासण्यात यावी. आवश्यक असल्यास संपूर्ण प्रक्रियेची पुनर्पडताळणी (Re-verification) करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच भारत निवडणूक आयोग यांना सादर करण्यात आल्या आहेत.