चोपडा शहरात 30 रोजी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत आदिवासी सत्ता परिवर्तन परिषद -भुसावळात खासदार प्रकाश आंबेडकर माध्यमांशी साधणार संवाद

भुसावळ – वंचित बहुजन आघाडी व भारत आदिवासी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी सत्ता परिवर्तन परिषदेचे चोपडा शहरात सोमवार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार प्रकाश आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंबेडकर हे सोमवारी दुपारी 12 वाजता भुसावळ शहराला भेट देवून माध्यमांशी संवाद साधतील, अशी माहिती युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी दिली.

चोपडा येथे होणार परिषद
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील समविचारी आदिवासी पक्ष, संघटना यांच्याशी जवळीक साधत राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण दलित- आदिवासी-ओबीसी यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रात विविध तीन शहरात आदिवासी सत्ता परिवर्तन परिषद होत असून सोमवारी चोपडा नगरपालिका स्टेडीयमवर दुपारी चार वाजता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आदिवासी पार्टीचे मुख्य संरक्षक तसेच नवनिर्वाचित खासदार राजकुमार रोत (राजस्थान) देखील या परिषदेस उद्घाटक म्हणून उपस्थित असतील.

परिषदेस दलित, आदिवासी व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन परिषदेचे निमंत्रक भारत आदिवासी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष सुनील गायकवाड, वंचितच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महासचिव अ‍ॅड. योगेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक बाविस्कर यांनी केले आहे.