भुसावळ (प्रतिनिधी) – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, पुढील काही तासांत हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, तसेच जनावरे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धरण प्रशासनाने रविवारी रात्री ९ वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी २११.५१० मीटर इतकी असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) २१४.००० मीटर आहे. धरणात सध्या २५७.५० दशलक्ष घनमीटर (Mm³) म्हणजेच ६६.३७ टक्के एकूण जलसाठा असून, उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा १२४.५० दशलक्ष घनमीटर (४८.८२ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, धरण परिसरात रविवारी ६ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ३४ मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने, पुढील काही तासांत पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी रविवारी दुपारी ४ वाजता धरण प्रशासनाने 'पूर सतर्कता' (Flood Alert) जारी करत तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. नदीपात्रात किंवा नदीकाठावर अनावश्यक वावर टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.



