भुसावळ : मणि लॉण्ड्रींगसाठी तुमचे खाते वापरण्यात आले असून पोर्नोग्राफीबाबत तुमच्याविरोधात 17 तक्रारी आल्याचे सांगत भामट्याने सुप्रीम कोर्टाच्या नावे पत्र पाठवत भुसावळातील रेल्वे नोकरदाराला तब्बल 22 लाखांचा गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने जळगाव सायबरमध्ये विनायक बाबर नाव सांगणार्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुप्रीम कोर्टाचे पाठवले पत्र
भुसावळातील रेल्वे कर्मचारी व खडका रोड भागातील गडकरी नगर भागात ब्रिजलाल राजनाथ पाल (53) हे नोकरदार वास्तव्यास आहेत. 15 ते 26 जुलैदरम्यान त्यांना विनायक बाबर नाव सांगणार्या भामट्याने 90680-02905, 94736-26022, 72378-64069 या क्रमांकावरून व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉल, व्हॉटसअॅप चॅट करून मुंबई टिळकनगर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत तुमचे बँक खाते मणी लॉण्ड्रींगसाठी वापरण्यात आले असून तुमच्याविरोधात बेकायदेशीर अॅडव्हर्टटायझिंग अॅण्ड हॅरेसिंग पोर्नोग्राफी व्हिडिओबाबत 17 तक्रारी दाखल असल्याचे धमकावले व सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे पत्र पाठवत कारवाई टाळण्यासाठी वेळोवेळी मागणी करून ऑनलाईन पद्धत्तीने 22 लाख रुपये उकळले. दरम्यान, गुन्ह्यात न अडकण्यासाठी व सीम बंद न पडण्यासाठी कर्मचार्याने मुदत ठेवी व मॅच्युअल फंडाची एसआयपी तोडू रक्कम जमा केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाल यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.


