वरणगाव –
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असुन गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे . तर याबाबत माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्रामीण रुग्णालयात तातडीने वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा रुग्णालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे .
भुसावळ तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून वरणगाव शहराची ओळख असुन शहरातील लोकसंख्या ४० हजाराच्यावर पोहचली आहे .

तसेच या शहराला २५ खेडे गावांचा संपर्क असल्याने शहरातील बाजारपेठेसह बँक , पोष्ट, विज वितरण कंपनी अशा कार्यालयासह ग्रामीण रुग्णालयाशी नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो. यामध्ये सर्वाधिक महत्वाचा संपर्क ग्रामीण रुग्णालयाशी येत असल्याने रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते . मात्र, या रुग्णालयात अत्याधूनिक यंत्रणा असतांना वैद्यकिय अधिकारी व संबंधीत तज्ञ कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना आवश्यक उपचाराअभावी वंचीत रहावे लागते . त्यातच दोन दिवसापासून वैद्यकीय अधिकारी डॉ . गिरीष उगले यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली असून शनिवारी सकाळी बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली होती. याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी शामराव धनगर, योगेश माळी यांचेसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जावून कार्यालयीन सहायक अधिक्षक आकाश इंगळे यांचेशी चर्चा करुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील व प्रशासनाशी संपर्क करीत तातडीने ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही केल्यास रुग्णालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे .
जख्मींवर उपचार करणार कोण ?
वरणगाव शहर हे राष्ट्रीय महामार्गालगतच असल्याने या महामार्गावर किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघाताची घटना नित्याचीच झाली असून अपघातातील जख्मींना प्राथमिक उपचारार्थ तातडीने वरणगांव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले जाते . मात्र, सद्यस्थितीत रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच उपलब्ध नसल्याने जखमींवर उपचार करणार कोण? तसेच प्राथमिक उपचाराअभावी एखाद्या जखमीचा मृत्यु झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा संतप्त प्रश्न निर्माण होत आहे .
अशी आहे कर्मचारी संख्या
वरणगांव ग्रामीण रुग्णालयात तिन वैद्यकीय अधिकारी ( सद्यस्थितीत एकही नाही ), परिचारीका – ७ , लिपीक – ३ , एक्स रे टेक्नीशियन – १ , लॅब टेक्नीशियन – २ , फार्मासिस्ट – १ , शिपाई – १ , चालक – १ , वार्ड बॉय – ४, स्विपर – २ अशी कर्मचारी संख्या आहे .


