भुसावळातील जाम मोहल्ला भागातील रीक्षा चालकांचा ठिय्या : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘भीक मागो’ आंदोलनातून पालिकेचा निषेध –

भुसावळ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या जाम मोहल्ला मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानंतरही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या 70 चालकांनी भीक मांगो आंदोलन केले शिवाय रीक्षा बंद ठेवून पालिका प्रशासनाच्या कृतीचा निषेध केला. या आंदोलनामुळे मात्र प्रवाशांना पायपीट करावी लागल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. दरम्यान, भीक मागून जमा झालेली रक्कम पालिकेला मनीऑर्डरद्वारे देण्यात येणार आहे.

रीक्षा चालकांच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका
रेल्वे स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष पोलिस चौकीपर्यंतचा सुमारे 200 मीटर अंतराचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्यानंतरही पालिका या रस्त्याच्या दुरुस्तीकडे चालढकल करीत आहे. या रस्त्यावरून जाणार्‍या वाहन धारकांसह रीक्षा चालकांना मोठा त्रास सोसावा लागत असल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या 70 चालकांनी भीक मांगो आंदोलन केले शिवाय रीक्षादेखील बंद ठेवून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे प्रवाशांना मात्र पायपीट करीत घर गाठावे लागल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला.

जुन्या पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
युनियनचे अध्यक्ष तस्लीम खान यांच्या नेतृत्वात या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले तसेच महामानवांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून भिक्षेपोटी मिळालेली रक्कम बंद डब्यात साठवण्यात आली असून ती पालिकेला निधी म्हणून दिली जाणार आहे व रक्कम स्वीकारण्यात न आल्यास मनिऑर्डरने पालिकेला रक्कम दिली जाईल व लेखी आंदोलन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही रीक्षा चालक म्हणाले.

मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले की, एक-दोन दिवसात रस्त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात येईल.