जळगाव – जिल्ह्यात दिवसेंदिवस दरोडे,चोऱ्या आणि इतर अवैध धंदे बोकाळले आहेत.जिल्ह्यातील जामनेरनजीक असलेल्या एका ठिकाणावरून लुटमार करून पळ काढत असलेल्या सहा जणांच्या टोळक्याला मुक्ताईनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या बाबत वृत्त असे की, जामनेर शहरातील एका ठिकाणी सहा जणांच्या अट्टल चोरांच्या टोळीने गावठी कट्ट्यासह अन्य शस्त्रांचा धाक दाखवून लुट केली. यानंतर ही टोळी बोदवडच्या दिशेने पळाली. लूट झालेला संबंधीत व्यक्ती हा जामनेरातील प्रसिद्ध आणि प्रभावशाली असल्याने त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती बोदवड पोलिसांनी दिली. त्यांनी अडथळा निर्माण करून त्यांना अटकाव करण्याची तयारी केली. मात्र याआधीच चोरटे बोदवडवरून मुक्ताईनगरकडे पळाले होते.
दरम्यान, बोदवड पोलिसांनी मुक्ताईनगरच्या पोलिसांना तात्काळ याबाबतची माहिती कळवली.त्यांनी लागलीच सापळा रचून सहा जणांचा टोळीला अटक केली.पोलिसांनी ही खूप मोठी कामगिरी बजावली आहे.टोळीकडून शस्त्रे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.
जामनेर, बोदवड ,भुसावळ आणि मुक्ताईनगर येथील पोलीस दल टोळक्यांना पकडण्यासाठी कामाला लागले होते.
तथापि, या टोळीने नेमकी कुठे चोरी केली? या प्रकरणातील व्यक्तीचे राजकीय संबंध याबाबतची माहिती अद्याप मिळाली नव्हती.या घटनेची जामनेर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले.



