भुसावळ : शेतकर्याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी ९.३0 वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ ताब्यात घेतल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे ताब्यातील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी ही कारवाई केली.

कुर्हेपानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी तक्रारदार असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार असून एका शेतकर्याची पाच हजार रुपये किंमतीची मोटार अलीकडे चोरीला गेल्यानंतर संबंधित शेतकर्याने तालुका पोलिसांना माहिती कळवली होती. कुर्हे बीटचे हवालदार गव्हाळे यांनी शेतकर्याच्या तोंडी तक्रारीवरून तक्रारदार असलेल्या शेतकर्याशी संवाद साधून संबंधित शेतकर्यांचा तुमच्यावर मोटार चोरीचा आरोप असून प्रकरण मिटवण्यासाठी मला एक हजारांची व मोटार चोरीपोटी पाच हजार रुपये संबंधिताना देण्याची मागणी केली, अशी तक्रार तक्रारदार शेतकर्याने एसीबीकडे बुधवारी दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.
गव्हाळे यांची बुधवारी रात्र गस्त असल्याने त्यांनी ड्युटी आटोपल्यानंतर तक्रारदारल शेतकर्याला रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावले. शेतकर्याकडून सहा हजारांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने गव्हाळे यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.


