पुलावरील डांबरीकरण रखडल्याने वाहनधारक त्रस्त, दोन वर्षापूर्वी झाले महालखेडा गावाजवळील पुलाचे बांधकाम

कुऱ्हा – काकोडा – मुक्ताईनगर ते कुऱ्हा – काकोडा रस्त्यावरील महालखेडा गावाजवळ दोन वर्षापूर्वी नविन पुलाचे बांधकाम करण्यात आले असून नविन पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र,या पुलाच्या दोन्ही बाजुने टाकण्यात आलेल्या भरावावर अद्यापपर्यंतही डांबरीकरण करण्यात आले नाही. परिणामी,वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुक्ताईनगर ते कुऱ्हा – काकोडा या मार्गावर असलेल्या तिन ठिकाणच्या नाल्यावरील लहान पुल जमिनदोस्त करून मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे . यापैकी दोन पुलाचे काम सुरु असून ते पूर्णत्वास येत आहेत. तर महालखेडा गावाजवळील पुलाचे बांधकाम दोन वर्षापूर्वी पुर्णत्वास येवुनही पुलावरील तसेच पुलाच्या दोन्ही बाजुने टाकण्यात आलेल्या दगड मातीच्या भरावावर अद्यापपर्यंतही डांबरीकरण करण्यात आले नाही.परिणामी, उन्हाळ्यात वाहनांच्या वाहतुकीने उडणारी धुळ तर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे दुचाकी व इतर लहान वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे . मात्र, या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे .

एकमेव रहदारीचा मार्ग
मुक्ताईनगर ते विदर्भातील जळगांव – जामोद हा एकमेव मार्ग असून या मार्गावर अनेक लहान – मोठी गावे असल्याने हा मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. तसेच या मार्गावरील खान्देशच्या शेवटच्या सिमेवर असलेल्या वढोदा गावापर्यंत अनेक लहान मोठे नदी – नाले असून या नदी नाल्यावर नविन उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे.मात्र, नविन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येवूनही पुलालगतच्या मार्गावर डांबरीकरण केले जात नसल्याने दुचाकी व इतर लहान वाहन धारकांना काही अंतरापर्यंत मार्गक्रमण करतांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे .