संत साहित्याच्या राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंधाचे सादरीकरण

भुसावळ – पालघर जिल्ह्यातील वसई रोड येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात भुसावळ येथील रहिवासी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होवून आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले.
संत साहित्याची समकालीनता या विषयावरील हे चर्चासत्र अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील मराठी विभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. दिलीप धोंडगे यांनी संत साहित्याची समकालीनता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे निमंत्रक प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, समन्वयक प्रा.डॉ. शत्रुघ्न फड, डॉ. सखाराम डाखोरे, प्रा. शैलेश ओटी यांनी चर्चासत्राचे नियोजन केले. या चर्चासत्रात संत साहित्य आणि आजचे वर्तमान या विषयावर राज्यभरातील शोधनिबंध वाचकांनी आपले सादरीकरण केले. यात पहिलेच शोधनिबंध सादरीकरण करण्याचा सन्मान भुसावळ येथील संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांना मिळाला. संत एकनाथांची भारूडे म्हणजे नाथकालीन लोकजीवनाचे व लोक साहित्याचे प्रकट दर्शन हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. आपल्या सादरीकरणात त्यांनी संत एकनाथांची भारूडे हे लोकजीवन व लोकसाहित्याचा अलंकार असून तो समाज जीवनाशी एकरूप झाला असल्याने त्याची समकालीनता अद्यापही टिकून असल्याचे सांगितले. त्यानंतर अनेक शोधनिबंधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संतांची मूल्यदृष्टी या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण पार पडले. राष्ट्रीय स्तरावरील संत साहित्याच्या चर्चासत्रात सहभागाबद्दल शोधनिबंधकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांचे शोधनिबंध आयएसएसएन या नंबरने प्रसिद्ध करण्यात आले असून त्याची पुस्तिका देखील शोधनिबंधकांना प्रदान करण्यात आली.