भुसावळमध्ये दावते इस्लामी इंडियाच्या मदरशाच्या विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली ; भारतात शांततेसाठी प्रार्थना :


भुसावळ – 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दावते इस्लामी इंडियाच्या मदरसा जमियातुल मदीनाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भुसावळमध्ये तिरंगा रॅली काढली.
सकाळी ११:३० वाजता अमर दीप चौकातून या रॅलीची सुरूवात झाली व मॉर्डन रोड, गांधी चौक, बस स्टेशन परिसर, रेल्वे स्टेशन परिसर,आंबेडकर पुतळा परिसर विविध मार्गांनी फिरून रझा टॉवर येथे संपली. देशभक्तीपर गीते गात राष्ट्रध्वज आदरपूर्वक फडकवत विविध मार्गांवरून तिरंगा यात्रा पार पडली, या रॅलीत राष्ट्रध्वज तिरंग्याचे वाटपही करण्यात आले. लोकांनी फुलांची उधळण करून तिरंगा यात्रेचे उत्साहात स्वागत केले. तिरंगा यात्रेतील शिस्तीचे पोलिस प्रशासनानेही कौतुक केले.
रॅलीचे शेवटी दावते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी देशाच्या शांती, बंधुता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली आणि 15 ऑगस्ट 2022 ते 21 ऑगस्ट 2022 या कालावधीत चालणाऱ्या दावते इस्लामी इंडियाच्या वृक्षारोपण सप्ताहांतर्गत हा संदेशही दिला. “आपण रोपटे लावायचे आहे, ते झाड बनवायचे आहे आणि आपला देश हरित भारत बनवायचा आहे.”
ही तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी जुबेर अत्तारी, हाफिज मुंतझीर, कारी अन्वर रजा, हाफिज कासिम अत्तारी, इम्रान अत्तारी, आसिफ अत्तारी, अझहर कादरी, साबीर मेंबर, रफिक रोशन यांनी प्रयत्न केले.