वरणगाव – येथून जवळ असलेल्या कठोरा येथील वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलवर वीज वितरण कंपनीतर्फे अधिक प्रमाणात भारनियमन केले जाते. ते भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी भाजपने चमको आंदोलन सोमवारी केले होते. परंतु गेल्या चार ते पाच दिवसा पासून कठोरा येथे कुठल्याही प्रकारचे लोडशेडिंग होत नाही आहे. त्यामुळे भाजपवाल्यांनी वरणगाव वासियांची लोडशेडिंगच्या नावाखाली दिशाभूल करू नये, असा इशारा वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी दिला आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी सण उत्सवाच्या काळात वरणगावमध्ये बारा ते पंधरा दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत होते. तेव्हा 9 एप्रिल रोजी सर्वात अगोदर मी शिवसेनेच्या वतीने नगरपालिका गाठून अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला होता. त्यानंतर वरणगावमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला होता.
भारनियमनातून दिलासा –
विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तूट शून्यावर आल्यामुळे चार ते पाच दिवसापासून राज्यात विना खंडित वीज पुरवठा सुरू असल्याचा दावा वरणगाव महावितरणचे सहाय्यक उप अभियंता यु. डी. पाटील यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले. तरी देखील त्यांनी चमकोगिरीसाठी ठिय्या आंदोलन केले, परंतु हे आंदोलन फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे संतोष माळी यांनी सांगितले.
आमदार सावकारे यांनी कठोरा पंपिंग हाऊसवर 500 केव्ही चे ट्रान्सफर लावावे –
कठोरा येथील पंपिंग हाऊसवर कित्येक वर्षापासून 200 केव्ही क्षमतेचे ट्रांसफार्मर बसविलेले आहे. आता आमदार सावकारे हे भाजपाचे असून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कठोरा येथील ट्रांसफार्मरची क्षमता वाढविण्यासाठी आमदार सावकारे यांना सांगावे, जेणेकरून पाण्याची उचल जलद गतीने होऊन वरणगावकरांना पिण्याचे पाणी लवकर मिळेल असेही शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.
शिवसेनेची वीज वितरण कार्यालयात धडक-
सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने विज वितरण कार्यालयात निवेदन देऊन चमकोगिरी आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालय गाठून सहाय्यक अभियंता यु.डी.पाटील यांना भारनियमन बंद असल्याचा खुलासा करण्यास सांगितले. त्यानंतर भाजपाच्या चमकोगिरी आंदोलनाची हवाच शिवसेनेने काढून टाकली.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, आबा सोनार, विलास वंजारी, सुनील देववाटोळे, सागर वंजारी, वैभव लोखंडे, दीपक शेळके, अतुल पाटील, कालू शर्मा उपस्थित होते.


