भुसावळ : कुटुंबातील ज्येष्ठांच्या उत्तम संस्कारांमुळेच आजची पिढी घडत अाहे. ज्येष्ठांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असते. ती इतरांना वाटचाल करताना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरते, असे प्रतिपादन यावल येथील सरस्वती विद्यामंदिराचे प्रा.डाॅ.नरेंद्र महाले यांनी केले. श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत ‘कुटुंबाचा स्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रा.डाॅ.महाले यांनी सांगितले की, घरातील वयस्कर आणि ज्येष्ठ मंडळी कुटुंबाचा “स्व’ म्हणून महत्त्वाची आहेत. त्यांच्या उत्तम संस्कारामुळे आजची तरुण पिढी घडत आहे. संत ज्ञानेश्वरांनी बालपणातच आई-वडील गमावून सुद्धा पसायदान पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी मागितले. जगाला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी जिजाऊ मातेचे कणखर, खंबीर व्यक्तिमत्व होते. आजच्या एकल, विस्कळीत कुटुंबांमुळे पुढील पिढीवर संस्कार करण्यात, अडीअडचणीला उपयोगी पडण्यात सक्षम असूनही ज्येष्ठांची अवहेलना होते. एकत्र कुटुंबात निरनिराळ्या वयाच्या, निरनिराळ्या विचारांच्या व्यक्ती असतात. त्यांच्यात अधिकार, आदर आदी सांभाळण्याची एक उतरंड पाळली जाते. जी समाजात वावरताना आवश्यक असते, असे सांगितले.
श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेची सुरुवात राम नाम जपाने वैशाली विसपुते यांनी केली. विश्वप्रार्थना व गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन शीला उपाध्याय यांनी वाचन केले. दिनकर महाले, मंगला वाणी, अध्यक्ष सुरेश कुरंभट्टी यांच्यासह सदस्य उपस्थित होते


