इंडियन एअर फोर्समध्ये भारतातून पातोंडा गावातील विवाहितेची निवड –

चाळीसगाव : तालुक्यातील पातोंडा येथील विवाहिता तसेच भडगाव तालुक्यातील घुर्सडी येथील माहेर असलेल्या कामिनी तुषार सूर्यवंशी (कामिनी वसंतराव शिंदे) यांची इंडियन एअर फोर्स मार्फत घेतल्या जाणार्‍या नर्सिंग स्टाफ परीक्षेत देशातून 100 पैकी 94 टक्के गुण मिळवून यशस्वी निवड झाली. त्या नुकत्याच कर्नाटक राज्यातील बिदर येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या आहेत.

भारतातून पटकावला प्रथम क्रमांक
इंडियन एअर फोर्सच्या नर्सिंग स्टाफमधील एकमेव जागेसाठी भारतातून अनेक अर्ज आलेले होत. त्यातील 75 उमेदवार तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत पोहचले होते. त्या 75 उमेदवांरामध्ये प्रथम येत कामिनी सूर्यवंशी यांनी बाजी मारली आहे. कामिनी या विवाहित असून त्यांना एक छोटी मुलगी आहे. मुलीचा सांभाळ तसेच कुटुंब या सार्‍या जबाबदार्‍या पेलत त्यांनी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्या दहावीला असतानाच त्यांच्या आईचे छत्र हरपले होते तसेच बालवयातच दुःखाचा डोंगर कोसळला होता, मायेची सावली हरवल्याने काही काळ दुःखाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यावेळी आजी-आजोबा, मामा, वडील,काका, आत्या इत्यादींनी त्यांचा सांभाळ केला.

जिद्द व चिकाटीच्या जोरावर मिळवले यश
कामिनी यांचे प्राथमिक शिक्षण भडगाव तालुक्यातील घुसर्डी येथे तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या गोंडगाव या गावी झाले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण चाळीसगावच्या राष्ट्रीय ज्युनिअर कालेजमधून घेतले आहे तसेच औरंगाबाद येथून त्यांनी नर्सिंग कोर्स केला. लग्नानंतर इंडियन एअर फोर्सची तयारी करण्यासाठी त्यांनी चाळीसगावच्या दृष्टी फाउंडेशनमध्ये प्रवेश घेतला होता. तेथील प्राध्यापकांचे त्यांना यशस्वी मार्गदर्शन लाभले होते. शिवाय त्यांनी चिकाटी आणि व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.पती तुषार संजय सूर्यवंशी व कुटुंबातील सासू, सासरे व सर्व सदस्यांसह वडील वसंतराव शिंदे, भाऊ तुषार शिंदे इत्यादींचा त्यांना पाठिंबा होता. त्यांच्या या निवडीबद्दल माहेर व सासरकडील मंडळींत आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कामिनी शिंदे यांची निवड ही अनेक मुलींना व विशेषतः विवाहित स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरली आहे.

यशामागे अनेकांचा वाटा
विवाहितेने मिळवलेल्या यशामागे दृष्टी फाऊंडेशनचे संचालक वामन पाटील, प्रतिभा पाटील तसेच तिचे शिक्षक अजिज खाटीक,व संतराव पाटील यांचा खारीचा वाटा आहे. या दोन्हीही तिच्या गुरुंनी तिला 8 वी पासून तर नोकरीपर्यंत वेळोवेळी साथ दिलेली आहे, असे तिने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले तसेच कामिनी शिंदे मध्ये तिच्या आईंनी रुजविलेली स्वावलंबनाची भावना व तिच्यात असलेली जिद्द व चिकाटी हेच तिच्या यशाचे गमक आहे, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.