श्रीकृष्णाच्या पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व म्हणजे काला – हभप लक्ष्मण महाराज

भुसावळ – गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक असल्याचे प्रतिपादन हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी काल्याच्या कीर्तनात केले.
भुसावळ येथील दूर्गा कॉलनीत कै. सुधा पांडुरंग जंगले व कै. पराग पांडुरंग जंगले यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित भागवत सप्ताहाच्या समारोपात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहिभात या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करून त्यांनी श्रीकृष्ण लीलांचे कथन केले. ते म्हणाले की, लौकीक अर्थाने पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे खाद्यपदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय. गोकुळात श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. मात्र अलौकिक अर्थाने जीवशिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. असा काला जीवनात आनंदाची प्राप्ती करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण सप्ताहभरात लक्ष्मण महाराज कथा प्रवक्ते होते. भागवत कथेच्या पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महात्म्य सांगताना भक्तीपुत्र ज्ञान व वैराग्य व गोकर्ण कथा सांगितली. प्रथम स्कंदात व्यास व परीक्षित राजाची कथा सांगितली. द्वितीय स्कंदात शुकदेवाची कथा सांगून तृतीय स्कंदात मैत्रेय-विदुर संवाद आणि कर्दमाची गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी चतुर्थ स्कंदात दक्षयज्ञ, ध्रुव, वेना, पृथू, प्रचेत, पुरंजन यांची कथा तर पंचम स्कंदात प्रियव्रतवंश, ऋषभदेव व भरतराजाची कथा सांगितली. तिसऱ्या दिवशी षष्ठ स्कंदात भूगोल व भुवनेश वर्णन, अजामिळ कथा, दक्ष-प्रजापती, विश्वरूप, वृत्रासुराचे पूर्वचरीत्र व मरूद्गणाची उपपत्ती या कथा सांगितल्या. तर सप्तम स्कंदात प्रल्हाद चरित्र सांगितले. चौथ्या दिवशी अष्टम स्कंदात गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन, बलि-वामन, मत्स्यावतार या कथा तर नवम स्कंदात सुद्युम्न, च्यवनऋषी, अंबरिष व भगीरथ, राम अवतार, निनीराजा, चंद्रवंश व पुरूरवा-उर्वशी, परशुराम व ययाती चरित्र, दुष्यंत-शकुंतला, रतिदेव व विविधेवंश वर्णन अशा कथा सांगितल्या.
पाचव्या दिवशी दशम स्कंदाच्या पूर्वार्धात श्रीकृष्णजन्म, संकटे एकटी येत नाहीत, नामकरण व बाललीला, अद्भूत पराक्रम, वृंदावन विहार, कंसाचा वध, कर्तव्य व भावना या कथा तर उत्तरार्धातील कालयवनाचा नाश, रूक्मिणी स्वयंवर अशा कथा सांगितल्या. सहाव्या दिवशी दशम स्कंदाच्या उत्तरार्धातील श्रीकृष्णाचे इतर विवाह, रूक्मीचा अंत, पतीतोद्धार व शत्रूचे निर्दालन, जरासंध वध, शिशुपाल आदी दैत्यांचा वध, श्रीकृष्ण-सुदामा भेट, आत्मज्ञानाचे उपदेश, आणखी काही कथा सांगितल्या. सातव्या दिवशी एकादश स्कंदातील नारद-वसुदेव संवाद, यदुकुळाचा संहार व श्रीकृष्ण-उद्धव संवाद, उद्धव गीतेचा सारांश तर द्वादश स्कंदातील कलियुगाचा प्रारंभ व लक्षणे, वेद व पुराणे याविषयी सांगितले. त्याचप्रमाणे उपसंहारात श्रीमद्भागवत महात्म्य, पाठविधी व फलश्रुती सांगितली.