भुसावळ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक हा नागरिकांप्रती जागरूक असला पाहिजे. शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे अनुकरण करत संघर्षाची परंपरा कायम ठेवावी. आमदार-खासदार पक्ष सोडू शकतात, मात्र सच्चा शिवसैनिक आजही पक्षाशी निष्ठावान असून शिवसेना त्यांच्या मनामनात आहे. त्यामुळे मरगळ झटकून नव्या जोमाने संघटनात्मक कामाला लागा, एकजुटीने कार्य केल्यास संघटना निश्चितच अधिक बळकट होईल, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा रावेर लोकसभा मतदारसंघ व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. भुसावळ येथे रावेर लोकसभा मतदारसंघातील विभागीय लोकप्रतिनिधी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, यावल नगराध्यक्षा छायाताई पाटील, शहरप्रमुख गणेश सोनवणे (चौधरी), गजानन निळे सर, रेल कर्मचारी सेनेचे ललित मुथा, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उमाकांत शर्मा, महिला आघाडीच्या भुराबाई चव्हाण, भारती गोसावी यांच्यासह रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, चोपडा आणि यावल येथील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकीत संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शासनाच्या एसआयआर (SIR) कार्यक्रमांतर्गत बीएलओंना सहकार्य करण्याचे, संघटनेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे तसेच २७ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांचा निषेध व्यक्त करत संबंधित प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात रामरक्षा पठण व महाआरती आंदोलन आयोजित करण्यात येत असून, या आंदोलनात सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ते यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान बैठकीस माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, युवराज पाटील, ललित मुथा यांनी मनोगत व्यक्त करून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन श्री निळे यांनी केले तर आभार शहरप्रमुख गणेश सोनवणे यांनी मानले.


